प्रजासत्ताक दिनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट; राम मंदिर, दिल्ली टार्गेटवर, यंत्रणा हायअलर्ट

Foto
नवी दिल्ली : भारताच्या विविध शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह देशातील मोठी मंदिरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर दिल्लीसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था  ने या हल्ल्यासाठी एक गुप्त योजना तयार केली असून, त्याला कोड नेम 26-26 असं नाव देण्यात आलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अयोध्येचं राम मंदिर आणि जम्मूचं रघुनाथ मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. सुरक्षा यंत्रणांकडून इनपुट मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीतही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना आणि पंजाबमधील गँगस्टर्सच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिल्लीत दहशतवाद्यांचे पोस्टर्स 

गुप्तचर यंत्रणा सोशल मीडियावर सतत लक्ष ठेवून आहेत. काश्‍मिरी रेसिस्टन्स ग्रुप आणि फाल्कन स्क्वॉड यांसारख्या संघटनांकडून चिथावणीखोर धमक्या दिल्या जात आहेत. प्रजासत्ताक दिनाची सुरक्षा लक्षात घेता दिल्लीत दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्यांदाच दिल्लीतील एका दहशतवाद्याचा फोटो लावण्यात आला आहे.  

 मोहम्मद रेहान असे या दहशतवाद्याचे नाव असून तो ईशान्य दिल्लीतील रहिवासी असल्याचे समजते. संभल येथील अल-कायदा मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर हा दहशतवादी फरार झाला होता. सुरक्षा यंत्रणांनी सैयद मोहम्मद अर्शिया, मोहम्मद रेहान, मोहम्मद शरजील अख्तर, मोहम्मद उमर, अबू सुफियान आणि मोहम्मद शहीद फैजल अशा काही प्रमुख दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे.

दिल्लीत स्मार्ट चष्म्यांद्वारे विशेष सुरक्षा 

सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी दिल्ली पोलीस यावेळी FRS (Face Recognition System)  युक्त स्मार्ट चष्म्यांचा वापर करणार आहेत. एआय तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही उपकरणे गुन्हेगारांच्या डेटाबेसशी जोडलेली असतील. यामुळे गर्दीच्या ठिकाणी संशयितांची ओळख पटवणे काही सेकंदात शक्य होणार आहे.

जम्मू-काश्‍मीरमध्ये शोधमोहीम  

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जम्मूत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रोहिंग्या मुस्लिमांची मोठी लोकसंख्या असलेल्या भागात बुधवारी शोधमोहीम राबवण्यात आली. तसेच किश्‍तवाड जिल्ह्याच्या डोंगराळ भागात लष्कराची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. सीमावर्ती भाग आणि महामार्गांवर कडेकोट नाकाबंदी करण्यात आली असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत.